top of page
Search

मी कोण आहे?

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना आपले बरेच गैरसमज असतात. आपल्याला असे वाटते की आपण खूप लकी आहोत, आपण एखादा शेअर घेतला की तो वर जाईल. आपल्याला असे वाटते की अमुक एखादा शेअर आता बराच खाली पडलेला आहे, यामध्ये आत्ता पैसे लावले तर भरपूर प्रॉफिट होईल. आपल्याला असे वाटते की अमुक लेव्हलला सपोर्ट आहे, त्यामुळे यापेक्षा खाली मार्केट जाऊच शकत नाही. आपल्याला असे वाटते की हा शेअर आता 52 आठवड्यांच्या "लो" वर आहे, इथून आता वरच जाणार. या आणि अश्या बर्‍याच गैरसमजांमुळे आपण शेअर बाजारामध्ये पैसे लावतो आणि बरेचदा पैसे गमावतो. वरील वाक्ये वाचताना तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल, की आपण नेहमी एक्स्टर्नल गोष्टींचा विचार करीत असतो ज्या गोष्टी आपल्या हातात कधीच नसतात. बाजार वर जाईल की खाली यावर आपला काही कंट्रोल आहे काय? तर नाही. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यांच्याबद्दल आपण कधीच विचार करीत नाही.

शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करताना आपण स्वतःला समजून घेतले पाहिजे. आपण नेमके कोण आहोत? या व्यापारामध्ये आपली नेमकी भूमिका काय हे आधी आपल्याला माहिती पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कितीही इंडिकेटर्स, प्राईज अ‍ॅक्शन, चार्ट्स, सपोर्ट, रेझिस्टन्स, डायव्हर्जन्स, फिबोनाची, ट्रेंड या कशाचाही अभ्यास केला तरी शेवटी मार्केट त्याला हवे तसेच वागणार. वर उल्लेख केलेली सर्व टूल्स ही मार्केटचा अंदाज लावायच्या पद्धती आहेत. कोणत्या इंडिकेटरने सांगितले म्हणून वर गेलेच पाहिजे असे कोणतेही बंधन बाजारावर नसते. बाजार जसा वागेल तसे त्याचे रिफ्लेक्शन या इंडिकेटर्सद्वारे आपल्याला मिळत असते. थोडक्यात इंडिकेटर्स आणि टूल्स "बाजारात काय झाले" हे आपल्याला सांगतात. यावरुन आपल्याला बाजारात पुढे काय होऊ शकेल याचा अंदाज लावायचा असतो. आणि अर्थात आपण नेहमी परफेक्ट अंदाज करुच शकत नाही. आपला अंदाज कधी ना कधीतरी चुकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. शेअर्सच्या या व्यापारामध्ये आपली भूमिका ही एका "रिस्क मॅनेजर"ची असली पाहिजे. वर म्हणल्यानुसार आपण प्रत्येक ट्रेड करण्याआधी एक अंदाज करुन त्या अंदाजानुसार ट्रेड घेत असतो. प्रत्येक अंदाज हा चुकू शकतो. म्हणजेच प्रत्येक ट्रेडमध्ये रिस्क आहे. शेअर ट्रेडर म्हणून आपले एकच काम आहे ते म्हणजे ही रिस्क व्यवस्थित मॅनेज करणे. समजा एका महिन्यामध्ये तुम्ही दहा ट्रेड्स घेतले, तर यातले काही ट्रेड्स चुकणार आणि काही ट्रेड्स यशस्वी ठरणार. तुम्ही जर एक कुशल "रिस्क मॅनेजर" असाल तरच तुम्ही या ट्रेडिंगमधून प्रॉफिट मिळवू शकता. रिस्क मॅनेजमेंट जमत नसेल तर हा व्यापार तुमच्यासाठी नाही.


आपल्याला वाटते आपला प्रत्येक ट्रेड बरोबर ठरावा. भावनिकदृष्ट्या आपल्याला असे वाटणे स्वाभाविक आहे, परंतु उद्या ब्रम्हदेव जरी टर्मिनलवर ट्रेडिंगसाठी बसले तरी त्यांचेसुद्धा सर्व ट्रेड्स बरोबर येऊच शकत नाहीत. अश्या परिस्थितीमध्ये भावनेमध्ये वाहून न जाता जर आपण प्रत्येक ट्रेडसाठी एक रणनीती आखून त्यानुसार काम केले तरच आपण हा व्यवसाय यशस्वीरित्या करु शकतो. कोणत्या ट्रेडमध्ये किती भांडवल गुंतवायचे? किती लॉस होत असेल तर ट्रेड बंद करायचा? समजा आपला ट्रेड प्रॉफिटमध्ये गेला तर किती प्रॉफिट घेणे योग्य आहे? या मुद्द्यांचे केले गेलेले प्लॅनिंग म्हणजे रणनीती!


तेव्हा आपल्या हातामध्ये नसलेल्या बाह्य गोष्टींमध्ये गुंतून न जाता आपण स्वतः एक रिस्क मॅनेजर आहोत या भूमिकेतून जर आपण विचार केला तर शेअर ट्रेडिंग आपल्याला अतिशय लाभदायक ठरु शकते. शेअर ट्रेडिंग करण्याची एक प्रभावी पद्धत तुम्हाला शिकायची आहे काय? पुढील व्हिडिओ नीट बघा -



2,116 views0 comments

Opmerkingen


bottom of page