top of page
Search

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा

"अतिशहाणा त्याचा बैल रिकामा" ही म्हण आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकलेली आहे. ही म्हण शेअर बाजारामध्येदेखील तंतोतंत लागू पडते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. आज आपण शेअर बाजारामधल्या अति अभ्यासू लोकांबद्दल बोलणार आहोत. शेअर बाजार म्हणजे जुगार, हा समज बाजूला सारुन याकडे अभ्यासपूर्वक बघणार्‍यांची आणि शेअर ट्रेडिंग व गुंतवणुकीकडे व्यवसाय म्हणून बघणार्‍यांची संख्या गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे.

शेअर मार्केटमध्ये अभ्यास करण्याचे फंडामेंटल अ‍ॅनालिसिस, टेक्निकल अ‍ॅनालिसिस, प्राईज अ‍ॅक्शन स्टडी इत्यादी विविध प्रकार आहेत. फंडामेंटल अ‍ॅनालिसिसमध्ये कंपन्यांची बॅलन्स शीट्स, अकाऊंट्स व कंपनीच्या व्यवसायाची स्थिती या गोष्टींचा अभ्यास करुन ज्या शेअर्सची किंमत भविष्यात वाढू शकेल असे शेअर्स शोधले जातात व त्यामध्ये गुंतवणूक केली जाते. टेक्निकल अ‍ॅनालिसिस, अर्थात तांत्रिक विश्लेषण यामध्ये शेअरच्या किमतींच्या चार्ट्सचा अभ्यास केला जातो, चार्टवरील पूर्वी घडलेले पॅटर्न्स शोधले जातात व त्या अभ्यासावर आधारित असे गुंतवणुकीचे निर्णय घेतले जातात. प्राईज अ‍ॅक्शनमध्ये इतर काहीही न बघता फक्त शेअरचा भाव डोळ्यासमोर ठेवला जातो आणि काही ठोकताळ्यांच्या आधारावर ट्रेड्स घेतले जातात. या सर्व अभ्यासाच्या पद्धती आहेत आणि प्रत्येक पद्धतीचे आपापले फायदे आहेत तसेच प्रत्येक पद्धतीला आपापल्या मर्यादा आहेत.

वर उल्लेख केल्याप्रमाणे सध्या बाजारामध्ये अभ्यास करुन गुंतवणूक करण्याचा एक ट्रेंड आलेला आहे. आणि बरेचदा अति अभ्यासू ट्रेडर्स स्वतःच्या अभ्यासामध्ये इतके गुरफटुन जातात की त्यांना या अभ्यासानुसार मिळालेला कोणता ट्रेड घ्यावा आणि कोणता घेऊ नये हेच समजत नाही. इंग्रजीमध्ये असे गमतीने म्हणले जाते की "ओव्हर अ‍ॅनालिसिस लीड्स टुवर्ड्स डिसिजन पॅरालिसिस". म्हणजे एखाद्या गोष्टीचा अति किचकट पद्धतीने अभ्यास केला की त्या गोष्टीमधील सर्व प्रकारचे गुण व दोष आपल्या समोर उघड होतात आणि मग निर्णय घेणे अवघड होऊन बसते.


उदाहरणार्थ एखाद्या शेअरच्या टेक्निकल चार्टवर क्लिअर कट ब्रेक-आऊट दिसत असतो, हा शेअर वाढण्याची शक्यता सर्वाधिक असते. परंतु अति अभ्यासू ट्रेडर त्याच वेळी त्या कंपनीचे बॅलन्स शीट काढुन बसलेला असतो आणि त्याला तिथे "डेट इक्विटी रेश्यो" हा अपेक्षेपेक्षा जास्त दिसतो. मग अश्या परिस्थितीमध्ये खरेदीचा निर्णय टाळला जातो. पण हाच शेअर दोन आठवड्यात जेव्हा चाळीस टक्के वाढ दाखवतो तेव्हा आपल्या अति अभ्यासू ट्रेडरचा विश्वास बॅलन्स शीटवरुन उडालेला असतो. मग पुढे कधीतरी कोणतेही ट्रेड्स घेताना बॅलन्स शीट बघणे म्हणजे मूर्खपणा अशी समजुत करुन तो चुकीच्या शेअर्समध्ये भरपूर पैसे गुंतवतो. वास्तविक प्रत्येक अभ्यासामागे काही ठाम लॉजिक असते. अश्या चुका जेव्हा होतात तेव्हा अभ्यास चुकीचा नसतो परंतु अभ्यास करणार्‍याची त्या त्या वेळची मानसिकता ही चुकीची असू शकते. शेअर मार्केटमध्ये कधी कधी "गट फीलिंग"ला देखील महत्व देणे अतिशय गरजेचे आहे. शेअर बाजारामध्ये तुम्ही जर दररोज येत राहिलात आणि इथे होणार्‍या घटनांचे लक्षपूर्वक निरीक्षण करीत राहिलात तर आपोआप या बाजाराची नस कुठेतरी तुम्हाला जाणवू लागते. "बेस्ट ट्रेड्स आर टेकन व्हेन देअर इज मोस्ट अनसर्टनिटी" म्हणजे "जेव्हा बाजारामध्ये सर्वात जास्त अनिश्चितता असते तेव्हाच सर्वोत्तम असे ट्रेड्स घ्यायचे असतात." अभ्यासाच्या सर्व पॅरामीटर्समध्ये जेव्हा शेअर फिट बसत असेल तेव्हा तो सर्वात जास्त महाग झालेला असतो. कारण "मार्केट्स डिस्काऊंट एव्हरीथिंग!" अनसर्टन काळामध्ये योग्य ट्रेड्स ज्याला घेता येतात तोच खरा सिकंदर!


अति अभ्यासाच्या चक्रव्यूहामध्ये अडकायचे नसेल तर आपल्याला काही गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. आपल्या ट्रेडिंगमध्ये आपण आधीच आपली काम करायची पद्धत किंवा स्ट्रॅटेजी ही ठामपणे ठरवली पाहिजे. आणि आपण ठरवलेल्या या नियमांचे सातत्यपूर्वक पालन करीत राहिले पाहिजे. प्रत्येक ट्रेडच्या वेळी जर आपण प्रत्येक स्ट्रॅटेजीचे नियम लावत बसलो तर आपण एकही ट्रेड घेऊ शकणार नाही. कारण प्रत्येक ठिकाणी काही प्लस पॉईंट्स आहेत तर काही मर्यादा आहेत. तसेच आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये देखील प्रत्यक्ष काम करताना थोडासा कॉमन सेन्सचा वापर करणे शिकले पाहिजे. उदाहरणार्थ आपण एखादी स्ट्रॅटेजी वापरुन काम करीत आहोत जिथे चार्टवर अमुक फॉर्मेशन झाले की आपण शेअर खरेदी करणार. असे फॉर्मेशन आपल्याला दिसले देखील. परंतु त्याच वेळी समजा व्याजदर वाढण्याची शक्यता असेल, आणि एकूण बाजार जर त्याला नकारात्मक प्रतिसाद देत असेल, तर आपल्या स्ट्रॅटेजीवर अडून न राहता आपण तो ट्रेड सोडायला देखील शिकले पाहिजे.


शेअर बाजारामध्ये यशस्वीरित्या ट्रेडिंग करणे हे एक शास्त्र आहे आणि हे शास्त्र शिकणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज्‌ असतात. आपल्याला जर शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण या पद्धती व्यवस्थित शिकून घेतल्या पाहिजेत. गुंतवणूक कट्टा या उपक्रमाद्वारे तुम्हाला अश्या विविध पद्धती शिकण्याची संधी मिळते. गुंतवणूक कट्ट्याबद्दल अधिक माहिती जर तुम्हाला हवे असेल तर येत्या रविवारी दुपारी बारा वाजता आपला एक विनामूल्य वेबिनार होणार आहे तो नक्की अटेंड करा


वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar


(वेबिनार विनामूल्य आहे, परंतु रजिस्ट्रेशन आवश्यक आहे)


नीरज बोरगांवकर




1,594 views0 comments

Comments


bottom of page