top of page
Search

हेजिंग - सर्वात खतरनाक इन्श्युरन्स पॉलिसी!

जुन्या काळामध्ये एक म्हण वापरली जात असे - सुनिल गावसकर, लता मंगेशकर आणि जीवन विमा याला पर्याय नाही. विमा म्हणजेच इन्शुरन्स हा आपल्या आयुष्यामधील एक अविभाज्य घटक असला पाहिजे. आयुष्यामधील सर्व गोष्टी या अनप्रेडिक्टेबल आहेत. त्यामुळे आयुष्य जगताना आपल्याकडे प्रत्येक अनिश्चित गोष्टीसाठी विम्याचे संरक्षण असणे हे आवश्यक आहे. आपला विषय हा शेअर मार्केट व गुंतवणूक या विषयाशी निगडित असल्यामुळे आपण शेअर मार्केटमधील इन्श्युरन्सबद्दल बोलुयात.

शेअर मार्केटमध्ये काम करताना आपण बरेचदा "हेजिंग" हा शब्द ऐकतो. हेजिंग म्हणजे काय याची बर्‍याच जणांना कल्पना नसते. आजच्या या लेखामध्ये आपण हेजिंग ही संकल्पना काय आहे हे सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. "हेज" हा इंग्रजी भाषेमधील एक शब्द आहे. या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये "कुंपण" असा आहे. आपल्या प्रॉपर्टीमध्ये कोणी व्यक्ती अथवा जनावर घुसून आपले नुकसान करु नये म्हणून आपण आपल्या घराला अथवा शेताला कुंपण घालतो. आपल्या मिळकतीचे संरक्षण करणे हे कुंपणाचे मुख्य कार्य आहे. शेअर मार्केट किंवा कोणत्याही फायनान्शिअल व्यवहारामध्येदेखील आपण या कुंपणाचा वापर करुन आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवू शकतो. हेजिंग हे आयुष्यामध्ये सर्व प्रकारच्या व्यवहारामध्ये वापरले जाते. "इन्श्युरन्स काढणे" हादेखील एक हेजिंगचाच प्रकार आहे. अशी कल्पना करा, की तुम्ही एक गाडी खरेदी केली. ही गाडी तुम्ही आता वापरणार आहात. गाडी वापरताना अपघात होण्याचा धोका असतो. समजा असा एखादा अनपेक्षित अपघात घडला आणि त्यामध्ये तुमच्या गाडीला नुकसान झाले, तर आपण अगोदरच या गाडीचा इन्श्युरन्स काढलेला असतो. या इन्श्युरन्सनुसार आपले नुकसान हे इन्श्युरन्स कंपनी भरुन देणार असते. आणि या सुविधेबद्दल आपण या इन्श्युरन्स कंपनीकडे दर वर्षी काही नाममात्र "प्रिमियम" रक्कम भरत असतो. आपण आपल्या गाडीचा इन्श्युरन्स काढतो, मेडिकल इन्श्युरन्स काढतो, इतकेच काय आपण आपला जीवन विमादेखील काढलेला असतो. परंतु आपल्या गुंतवणुकीचे काय? आपण समजा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केलेली असेल आणि उद्या समजा मार्केट कोसळले, तर आपल्या गुंतवणुकीचे काय? तर यासाठीच शेअर मार्केटमध्ये देखील इन्श्युरन्स काढण्याची सोय असते आणि यालाच हेजिंग असे म्हणतात.


सर्वप्रथम शेअर बाजाराकडे जाण्याअगोदर एक वेगळ्या प्रकारचे उदाहरण देतो. समजा तुम्ही एक व्यापारी आहात. तुम्ही भारतामध्ये पेन्सिली तयार करता आणि अमेरिकेमध्ये एक्स्पोर्ट करता. तुम्ही पेन्सिली पाठवल्या की सुमारे एका महिन्यानंतर तुम्हाला तुमचे पेमेंट मिळणार आहे. हे पेमेंट तुम्हाला अमेरिकन डॉलर्सच्या रुपामध्ये मिळणार आहे. आता अशी कल्पना करा, आज डॉलरचा भाव 75 रुपये आहे. तुम्ही 75000 रुपयांच्या पेन्सिली अमेरिकेत पाठवल्या. म्हणजेच एका महिन्यानंतर तुम्हाला अमेरिकेमधून 1000 डॉलर्सचे पेमेंट मिळणार आहे. इथपर्यंत सर्व ओके आहे. परंतु या एका महिन्याच्या काळामध्ये समजा पुतिनचे डोके फिरले आणि त्याने अमेरिकेवर हल्ला चढवला किंवा कोणतीही जागतिक घडामोड घडली जिच्यामुळे डॉलरचा भाव खाली पडला आणि फक्त 60 रुपये झाला तर काय होईल? तुमचे कॉंट्रॅक्ट हे 1000 डॉलर्सचे आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त 60000 रुपयेच मिळतील. म्हणजेच तुम्हाला 15000 रुपयांचे अनावश्यक नुकसान होईल. ही जी तुमच्यासमोर डॉलर प्राईज रिस्क आहे, त्या रिस्कचा तुम्ही इन्श्युरन्स काढू शकता. भारतामध्ये करन्सी एक्स्चेंज आहे. ज्या दिवशी तुम्ही 1000 डॉलरच्या पेन्सिली पाठवाल त्याच दिवशी तुम्हाला अधिकृत भारतीय करन्सी एक्स्चेंजवर जाऊन 1000 डॉलर्स फ्युचर्समध्ये एक लॉट 75 रुपयांना विकून टाकायचा आहे. हा एक लॉट विकण्यासाठी तुम्हाला फक्त सुमारे 2000 रुपयांचे मार्जिन भरावे लागेल. आता महिन्याभरामध्ये जरी डॉलरचा भाव उतरुन 60 वर आला तरी तुम्हाला काळजी करायचे काहीच कारण नाही. कारण त्या व्यवहारामध्ये तुम्हाला जे 15000 चे नुकसान होईल ते इथे फ्युचर शॉर्टच्या सौद्यामध्ये भरुन निघेल. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही करन्सी एक्स्चेंजमध्ये 75 रुपयांचा पुट ऑप्शनदेखील खरेदी करुन ठेवू शकता. या पुट ऑप्शनमुळेदेखील तुमच्या पोझिशनचे संरक्षण करणे साध्य होते. यामध्ये तर अक्षरशः 300 ते 400 रुपये भरुन तुम्ही हे कॉंट्रॅक्ट खरेदी करु शकता. पुट ऑप्शन याचा अर्थ "निर्धारित भावावर विक्री करण्याचा हक्क"! म्हणजेच भाव कितीही झाला तरी तुम्ही तुमची गुंतवणूक तुम्हाला हव्या त्या भावामध्ये विकू शकता.


फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे आपल्या गुंतवणुकीचा इन्श्युरन्स काढण्याचे एक जबरदस्त टूल आहे. आता शेअर बाजाराकडे वळुयात. तुम्ही समजा एक गुंतवणूकदार आहात आणि तुमच्याकडे भरपूर चांगले चांगले शेअर्स आहेत. बाजार खूप वर वर जातो आणि आपल्याला अचानक बाजार खाली पडेल की काय अशी भीती सतावू लागते. 2021 च्या जुलै महिन्यामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये अशीच एक परिस्थिती आलेली होती. कोरोनानंतर 7500 वर घसरलेला निफ्टी या काळामध्ये जबरदस्त वधारुन 15800 च्या पातळीवर ट्रेड करीत होता. इथे बर्‍याच गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून वाढलेले होते, आणि आता बाजार खाली पडेल की काय अशी एक भीती गुंतवणूकदारांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. स्मार्ट गुंतवणूकदारांनी या काळामध्ये या भीतीमुळे घाबरुन जाऊन आपले शेअर्स विकण्याच्या ऐवजी आपल्या गुंतवणुकीचा इन्श्युरन्स काढण्याचा पर्याय निवडला. आणि सप्टेंबर व ऑक्टोबर 2021 या महिन्यांचे 15500 व 16000 चे पुट ऑप्शन्स खरेदी करुन ठेवले. समजा बाजारामधील भीती खरी ठरली असती आणि बाजार खरोखर खाली कोसळला असता, तर या सर्व गुंतवणूकदारांच्या शेअर्सच्या किमतीदेखील खाली आल्या असत्या. परंतु हे जे पुट ऑप्शन्स त्यांनी खरेदी करुन ठेवले होते त्यांमध्ये त्यांना प्रचंड असा फायदा झाला असता आणि येऊ घातलेल्या मंदीचा फटका त्यांना बसला नसता. बाजारामधील भीती खोटी ठरली आणि बाजार वरच्या दिशेला 18600 पर्यंत गेला. या तेजीमुळे या स्मार्ट गुंतवणूकदारांचा फक्त प्रिमियमचा लॉस झाला!

समजा तुम्ही एक गुंतवणूकदार असाल आणि जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये बाजार खाली पडेल अशी भीती निर्माण होईल तेव्हा तेव्हा तुम्ही असे पुट ऑप्शन्स खरेदी करुन ठेवू शकता आणि स्वतःला येऊ घातलेल्या मंदीपासून सुरक्षित ठेवू शकता. फ्युचर्स आणि ऑप्शन्स ही हेजिंग करण्याची साधने आहेत. सर्वसामान्य ट्रेडर ऑप्शन्समध्ये सट्टेबाजी करतो आणि कायम फटके खातो, परंतु स्मार्ट गुंतवणूकदार मात्र या साधनांचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करीत असतो आणि स्वतःच्या गुंतवणुकीचे संरक्षण करीत असतो.


फ्युचर्स आणि ऑप्शन्स या प्रकारामध्ये असंख्य प्रकारच्या स्ट्रॅटेजीज्‌ करता येतात आणि यामधून आपल्या पोर्टफोलिओ संरक्षण तर करता येतेच, त्याचबरोबर आपल्याला नियमित रुपात काही उत्पन्नदेखील मिळवता येते. गुंतवणूक कट्टा पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन या प्रोग्रॅममध्ये तुम्हाला शेअर मार्केटविषयी सर्व युक्त्यांचे व्यवस्थित प्रशिक्षण सोप्या मराठी भाषेमध्ये मिळवता येते. या उपक्रमाची माहिती जर हवी असेल तर येत्या रविवारी होणार्‍या वेबिनारसाठी रजिस्टर करा आणि वेबिनारचा विषय कोणता आहे हे जाणून घ्या


वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar


नीरज बोरगांवकर

गुंतवणूक कट्टा



1,717 views2 comments

2 Comments


chougulen995
May 11, 2022

जबरदस्त लेख सर तुमची सांगण्याची पद्धत खरंच मस्त आहे साध्य आणि सरळ भाषेत समजतं ......धन्यवाद सर

Like

nileshkantak
nileshkantak
May 03, 2022

अमूल्य मार्गदर्शन. अनेक धन्यवाद.

Like
bottom of page