top of page
Search

शेअर बाजारामधील भीतीचा थर्मामीटर! इंडिया विक्स

शेअर बाजारामध्ये दररोज वेगवेगळ्या शेअर्सच्या किमतींचे चढ-उतार होताना आपण बघत असतो. हे चढ-उतार होण्यामागील मुख्य कारण अधिकांश ट्रेडर्सनी केलेली खरेदी आणि विक्री हे आहे. ज्यावेळी अधिकांश लोकांना शेअर बाजार वर जाईल असे वाटते तेव्हा हे अधिकांश लोक शेअर बाजारामध्ये खरेदी सुरु करतात आणि यामुळे बाजारामधील "डिमांड" अर्थात मागणी वाढते, व शेअरच्या किमती वर जातात. तसेच ज्यावेळी अधिकांश लोकांना शेअर बाजार खाली जाईल असे वाटते तेव्हा हे अधिकांश लोक शेअर बाजारामध्ये विक्री सुरु करतात आणि त्यामुळे बाजारामधील "सप्लाय" अर्थात पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त होतो व शेअरच्या किमती खाली पडु लागतात.

शेअर बाजारामधील सरासरी मोजण्याकरिता "निफ्टी", "सेन्सेक्स" अश्या प्रकारचे "इंडेक्स" म्हणजेच निर्देशांक तयार केलेले आहेत. हे निर्देशांक बाजारामधील महत्वाच्या काही शेअर्सच्या स्थितीचा अभ्यास करुन शेअर मार्केट सध्या किती वर किंवा खाली आहे हे आपल्याला सांगत असतात. हे निर्देशांक शेअर बाजाराची किंमत मोजण्यासाठी वापरले जातात. परंतु बाजारामधील "व्होलटॅलिटी" अर्थात अस्थिरता किती हे मोजण्यासाठीदेखील एक वेगळ्या प्रकारचा निर्देशांक अस्तित्वात आहे. या निर्देशांकाला VIX म्हणजेच "व्होलटॅलिटी इंडेक्स" असे नाव आहे.


या VIX लाच "फिअर इंडेक्स" म्हणजेच भीतीचा निर्देशांक असेदेखील म्हणले जाते. VIX हा निर्देशांक बघून आपल्याला सध्या बाजारामधील अस्थिरता किती आहे हे समजून येते. ज्यावेळी VIX चा आकडा मोठा असतो त्यावेळी बाजार खूप जास्त अस्थिर असतो आणि VIX ज्यावेळी खाली पडतो त्यावेळी बाजारामधील अस्थिरता कमी झालेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ बजेटच्या दिवशी अर्थमंत्री जेव्हा आपले बजेट सादर करीत असतात तोपर्यंत हा VIX आपल्याला वर असलेला दिसून येतो, आणि बजेट सादर करुन झाले की लगेच हा VIX खाली पडताना दिसतो. हीच गोष्ट आपल्याला निवडणूक निकालांच्या दिवशीदेखील दिसून येते.

VIX या निर्देशांकाचा वापर विविध प्रकारे केला जाऊ शकतो. प्रामुख्याने याचा वापर ऑप्शन्स ट्रेडिंग करताना प्रभावीरित्या केला जाऊ शकतो. VIX जेव्हा जास्त असेल तेव्हा बाजारामधील अस्थिरता अधिक आहे हे स्पष्ट होते. अश्या अस्थिरतेमुळे ऑप्शन्सची प्रिमियम्स ही जास्त असतात. त्यामुळे VIX जेव्हा जास्त असेल तेव्हा ऑप्शन खरेदी करणे टाळले पाहिजे. VIX जास्त असलेली वेळ ऑप्शन सेलिंग करण्यासाठी उत्तम असते. तसेच VIX कमी असताना ऑप्शन प्रिमियम्सदेखील कमी झालेली असतात. या वेळी ऑप्शन खरेदी करण्यासाठी चांगला काळ असतो. व यावेळी ऑप्शन विक्री टाळली पाहिजे.


गूगलवर किंवा कोणत्याही चार्टिंग सॉफ्टवेअरमध्ये INDIA-VIX असे टाकले की आपल्याला सध्या इंडिया VIX चा आकडा किती आहे हे समजते व बाजारामधील भीतीचे प्रमाण जास्त आहे किंवा कमी आहे हे समजते. 24 मार्च 2020 या दिवशी हा भीतीचा निर्देशांक सर्वोच्च म्हणजे 86.64 वर गेलेला होता. याच दिवशी करोना व्हायरसची भीती सर्वोच्च स्थानावर पोहोचलेली होती. नंतर भीती कमी कमी होऊ लागली व VIX देखील कमी कमी होत 20 ते 25 च्या दरम्यान आला.


हा VIX आपल्या दीर्घकालीन इक्विटी गुंतवणुकीसाठीदेखील वापरला जाऊ शकतो. यासाठी थोड्याश्या लॉजिकल थिंकिंगची आवश्यकता आहे. समजा शेअर बाजार जोरदार कोसळत असेल आणि त्याचबरोबर हा VIX वर वर जात असेल तेव्हा आपण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी संधी शोधायला सुरुवात केली पाहिजे. आणि VIX मधील वाढ थांबून जेव्हा VIX खाली उतरायला लागेल तेव्हा आपण आपली इक्विटी गुंतवणूक वाढवू शकतो. कारण आता बाजारामधील अनावश्यक भीती संपलेली आहे आणि VIX खाली उतरत आहे. तसेच समजा बाजार सातत्यपूर्वक वाढत आहे आणि सोबत VIX देखील वर जात आहे, अश्यावेळी आपण प्रॉफिट बूकिंगसाठी संधी शोधू लागतो. VIX मधील वाढ थांबत आली की आपण आपले फायद्यामध्ये असणारे शेअर्स विकायची म्हणजेच प्रॉफिट बूकिंगची सुरुवात करु शकतो.गुंतवणूक कट्ट्याबद्दल थोडेसे


"गुंतवणूक कट्टा" हा खास मराठी माणसांकरिता चालवला जाणारा एक उपक्रम असून यामध्ये एक "पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" नावाचा ऑनलाईन कोर्स आम्ही तयार केलेला आहे. या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याकरिता एका मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार आज रात्री नऊ वाजता घेतला जाईल. पुढील लिंकवर रजिस्टर केल्यास बरोब्बर रात्री 9 वाजता हा वेबिनार तुम्हाला बघता येईल. वेबिनार सुमारे एक ते दीड तास चालेल आणि यामध्ये तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली जाईल. हा वेबिनार नक्की अटेंड करा.


रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar


(वरील माहिती हा कोणत्याही स्वरुपाचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तसेच सर्व माहिती ही इंटरनेटवरुन घेण्यात आली असून त्याच्या अचूकतेबद्दल कोणतीही हमी गुंतवणूक कट्टा घेत नाही)


856 views0 comments

コメント


bottom of page