Search
  • Neeraj Borgaonkar

फ्युचर्स अ‍ॅंड ऑप्शन्स

फ्युचर्स अ‍ॅंड ऑप्शन्स ही हेजिंग इंस्ट्रुमेंटस्‌ आहेत. "हेज" या शब्दाचा अर्थ कुंपण असा आहे. कमॉडिटी, चलन आणि शेअर्सची किंमत सतत बदलत असते. या बदलत्या किमतीमुळे या कमॉडिटी, चलन अथवा चलनाच्या मालक असलेल्या गुंतवणूकदारांसमोर भाव खाली गेल्यास नुकसान होण्याच्या धोक्याची टांगती तलवार कायम लटकत असते. याउलट या गोष्टी विकत घेण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांसमोर या गोष्टींचे भाव वाढल्यास अधिक किंमत देऊन खरेदी करावी लागण्याची रिस्क असते. थिअरीपेक्षा प्रत्यक्ष एक उदाहरण घेऊन समजुयात

एक काल्पनिक उदाहरण- *हेजिंगची पहिली पद्धत* समजा माझ्याजवळ "एशियन पेंट्स" या कंपनीचे 600 शेअर्स आहेत (खरेदी किंमत 1000/-रु. आत्ताचा भाव 1111/-रु.), आणि मला असं वाटतंय, की इलेक्शन्सच्या निकालानंतर एशियन पेंट्स खाली येऊ शकतो, याचाच अर्थ माझं नुकसान होऊ शकतं. अश्या परिस्थितीमधे माझ्याजवळची डिलिव्हरी विकुन टाकावी असं मला वाटु लागतं. पण मला माझी डिलिव्हरी विकायची गरज नाही. माझी डिलिव्हरी तशीच ठेवुन मी एशियन पेंट्सचे फ्युचर कॉंट्रॅक्ट "शॉर्ट सेल" म्हणजेच विकु शकतो. या कॉंट्रॅक्ट्सचंसुद्धा शेअर्सप्रमाणेच ट्रेडिंग होत असतं आणि अतिशय कमी मार्जिन भरुन तुम्ही हे ट्रेड करु शकता. त्यात डिलिव्हरी जवळ असली की फ्युचर्स कॉंट्रॅक्ट खरेदी करायला वेगळं मार्जिन द्यावं लागत नाही. फक्त लॉट पाहिजे. लहान रकमेत हे करता येत नाही. कॅश मार्केटमधे शेअरचा जो भाव असेल त्याच्या जवळपासचाच भाव फ्युचर्सचा असतो. दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या कॉंट्रॅक्ट्सची सेटलमेंट होत असते. डिसेंबर एक्स्पायरीपर्यंत गुजराथचा निकाल लागलेला असेल. तेव्हा माझ्या अंदाजानुसार समजा एशियन पेंट्सचा भाव कोसळुन 900/- रु. झाला, तर मी 1111/- रु. ला विकलेली फ्युचर पोझिशन खालच्या भावात कव्हर करु शकतो, ज्यात मला सव्वा लाख रुपयांचा फायदा वरच्यावर होईल. आणि समजा माझा अंदाज चुकीचा ठरुन भाव वर 1325/- रु. झाला. तर माझी फ्युचर्सची शॉर्ट पोझिशन वरती कव्हर करावीच लागेल ज्यात मला सव्वा लाखाचं नुकसान होईल. पण हे नुकसान मला माझ्या खिशामधुन भरुन देण्याची गरज नाही! कारण आपल्याजवळ जे सुरुवातीचे एशियन पेंट्सचे 600 शेअर्स आहेत, जे आपण त्याचाही भाव तेव्हा 1325/- रु. झालेला असणार आहे. ते शेअर्स विकुन मला 795000/- रु मिळतील. ज्यात माझी गुंतवणूक फक्त 600000/- रु. आहे. म्हणजेच डिलिव्हरीमधला माझा जो एक लाख पंच्याण्णव हजाराचा नफा आहे त्यातुन मी सव्वा लाखाचं नुकसान भरुन दिलं तरी माझे सत्तर हजार नफ्याचे उरतात. थोडक्यात तोट्याची कोणतीही रिस्क न घेता मी सव्वा लाख रुपये कमावु शकतो. म्हणजेच वरील व्यवहारामधे गुजराथ निकालांची जी भीती मला वाटत होती ती रिस्क मी फ्युचर्स कॉंट्रॅक्ट वापरुन नफ्यात "हेज" केली.

*आता बघुयात ऑप्शन्स, हेजिंगची दुसरी पद्धत.* समजा माझ्याजवळ "एशियन पेंट्स" या कंपनीचे 600 शेअर्स आहेत (खरेदी किंमत 1000/-रु. आत्ताचा भाव 1111/-रु.), आणि मला असं वाटतंय, की इलेक्शन्सच्या निकालानंतर एशियन पेंट्स खाली येऊ शकतो, याचाच अर्थ माझं नुकसान होऊ शकतं. अश्या परिस्थितीमधे माझ्याजवळची डिलिव्हरी विकुन टाकावी असं मला वाटु लागतं. पण मला माझी डिलिव्हरी विकायची गरज नाही. माझी डिलिव्हरी तशीच ठेवुन मी एशियन पेंट्सचे 600 शेअर्स वरच्या भावात विकण्याचा हक्क विकत घेऊ शकतो. विकण्याचा हक्क म्हणजे पुट ऑप्शन. हा हक्क घेतल्यानंतर आपण तो हक्क बजावलाच पाहिजे असा नियम नाही. पण वेळप्रसंगी आपण तो हक्क बजावु शकतो. म्हणजेच एशियन पेंट उद्या 900/- रु. जरी झाला आणि मी समजा 1120 चा पुट ऑप्शन खरेदी करुन ठेवला असेल तर एक्स्पायरीपर्यंत मी माझे शेअर्स 1120/- रु. प्रति शेअर्स या भावात विकु शकतो. मी समजा आज इलेक्शनच्या भीतीमुळे एशियन पेंट्सचा 1120 चा पुट ऑप्शन खरेदी करायचं ठरवलं तर मला तो ऑप्शन मिळेल 25/- रु प्रति शेअर. म्हणजेच 600 शेअरचे मला घालावे लागतील 15000/-. हे पैसे म्हणजे दुसरं तिसरं काही नसुन सहा लाखाच्या माझ्या गुंतवणुकीच्या इन्श्युरन्ससाठीचं प्रिमियम असेल. उद्या भाव कोसळला तरी माझे शेअर या इन्श्युरन्समुळे विकले जातात सहा लाख बहात्तर हजारात. म्हणजे बहात्तर हजार नफ्यात. आणि भाव जर वाढला, तर माझ्या पुट ऑप्शनमधे मी घातलेले पंधरा हजार वाया जातात. जसं टर्ममधे मेलो नाही तर इन्श्युरन्स प्रिमियम वाया जातं तसं! शेअर्स वेगवेगळ्या भावात म्हणजे स्ट्राईक प्राईजमधे विकायचे आणि खरेदी करण्याचे हक्क बाजारात ट्रेड होत असतात. खरेदी करायच्या हक्काला कॉल ऑप्शन असं म्हणलं जातं. आणि विकण्याचा हक्क असतो पुट ऑप्शन. ऑप्शन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसुन मगाशी सांगितल्यानुसार इन्श्युरन्स आहे.

*सर्वात महत्वाचं* वर सांगितल्यानुसार फ्युचर्स अ‍ॅंड ऑप्शन्स ही हेजिंग इंस्ट्रुमेंट्स आहेत. तुमच्याजवळ जर पॅरॅलल डिलिव्हरी असेल किंवा लॉट साईजइतकी डिलिव्हरी उचलण्याची ताकद असेल तरच यात पडा. नेकेड पोझिशन्स, म्हणजे एकतर्फी पोझिशन्स घेतल्यात तर आर्थिक मृत्यू निश्चित आहे हे ध्यानात ठेवा. फ्युचर ऑप्शन्समधे सट्टेबाजी न करता हेजिंगसाठी त्याचा वापर केला गेला पाहिजे. आणि पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नये.

नीरज बोरगांवकर

49 views0 comments

Recent Posts

See All

म्युच्युअल फंड सर्वांसाठी!

टीव्ही, पेपर सर्वत्र सध्या म्युच्युअल फंडांची जाहिरात सुरु आहे- "म्युच्युअल फंड सही है" म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? पॅन कार्ड आहे? आधार कार्ड आहे? मग म्युच्युअल फंड तुमच्याचसाठी आहे! म्युच्युअल फ

निफ्टी म्हणजे काय?

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवरील निवडक शेअर्सच्या किमतींचं विशिष्ट पद्धतीने काढलेलं अ‍ॅव्हरेज म्हणजे निफ्टी इंडेक्स होय. निफ्टी हा शेअर बाजाराचा निर्देशांक समजला जातो. हा निफ्टी कसा कॅल्क्युलेट होतो? इंडेक्स