top of page
Search

नेहमीची चूक - बैल गेला अन्‌ झोपा केला`

शेअर मार्केटमध्ये काम करीत असताना दररोज मला आपल्या ग्रामीण म्हणींचे महत्व पदोपदी पटत असते. आपले पूर्वज किती हुषार होते आणि किती चपखल अश्या म्हणी त्यांनी तयार केलेल्या आहेत याची जाणीव अक्षरशः मला दररोज होत असते. "गुंतवणूक कट्टा" या आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून माझा दररोज शेअर मार्केटमध्ये काम करणार्‍या अनेक लोकांशी संपर्क येतो. गुंतवणूक कट्ट्यामध्ये हजारो विद्यार्थी आहेत. या सर्व लोकांशी संपर्क साधत असताना मला अनेक गोष्टी बघायला व शिकायला मिळतात. "बैल गेला आणि झोपा केला" या म्हणीचे महत्व आपण आजच्या लेखामध्ये बघणार आहोत.

सर्वप्रथम आपण या बैलाची गोष्ट काय आहे ते बघुयात. एका गावामध्ये एक शेतकरी रहात असे. या शेतकर्‍याकडे एक सुंदर गोठा होता. या गोठ्यामध्ये तो शेतकरी त्याचा लाडका बैल बांधून ठेवीत असे. दिवसभर मस्त शेतामध्ये कष्ट करायचे आणि रात्री जेवण करुन छान आराम करायचा असा त्या शेतकर्‍याचा दिनक्रम होता. अचानक एके दिवशी त्या गावामध्ये गुरेढोरे नाहीशी होऊ लागली. असे म्हणले जाई की या गावाच्या जवळ असणार्‍या जंगलात एक वाघ आला आहे, आणि हा वाघ रात्रीच्या वेळी गावकर्‍यांची गुरे पळवतो. शेतकरी व त्याच्या कुटुंबाला चिंता सतावू लागली. कारण त्यांच्याकडेदेखील हा उमदा बैल होता आणि त्यांच्या गोठ्याला दरवाजादेखील नव्हता. शेतकर्‍याची बायको रोज शेतकर्‍याला सांगायची की धनी गोठ्याला झोपा, म्हणजेच कवाड करुन घ्या. आज करु उद्या करु असे म्हणता म्हणता काही काळ उलटला. गुरे नाहीशी होणे चालूच होते. एके दिवशी शेतकर्‍याने ठरवले, की काही झाले तरी आज झोपा तयार करायचाच. ठरवल्यानुसार शेतकरी शेतावरुन लवकर घरी आला, आणि त्याने लाकडांपासून सुंदर असा दरवाजा तयार केला. एव्हाना तार झाली होती. आता हा झोपा उद्या सकाळी गोठ्याबाहेर बसवायचा म्हणजे झाले. असा विचार करुन शेतकरी व त्याची बायको सुखात झोपले. सकाळे उठून बघतात तर काय; गोठा रिकामा! वाघोबांनी रात्रीमध्ये डाव साधला होता अन्‌ बैल पळवून नेलेला होता. शेतकर्‍याची बायको वैफल्याने म्हणली - "बैल गेला अन्‌ झोपा केला"! या छोट्याश्या गोष्टीवरुन आपल्याला काय शिकायला मिळाले? कोणतीही गोष्ट वेळच्या वेळीच करणे अतिशय आवश्यक आहे. वेळ निघून गेल्यावर ती गोष्ट करण्यामध्ये काहीच मतलब नसतो आणि मग पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय समोर दिसत नाही. शेअर मार्केटमध्येदेखील अनेक ट्रेडर्स ही चूक वारंवार करीत असतात.


कोणती चूक?


एका वाक्यात सांगायचे झाले तर - या ट्रेडमध्ये माझा "मॅक्सिमम लॉस" किती होऊ शकेल याचा विचार न करता ट्रेड घेणे! ही ती कॉमन चूक आहे. पोझिशनल ट्रेड असो, इंट्राडे ट्रेड असो, ऑप्शनमधील ट्रेड असो अथवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असो, आपण हे लक्षातच घेत नाही की आपला हा ट्रेड चुकू शकतो. शेअर मार्केट हे "अनप्रेडिक्टेबल" आहे. यामध्ये क्षणाक्षणाला परिस्थिती बदलत असते. आपण जो ट्रेड घेणार आहोत तो ट्रेड चुकूदेखील शकतो याची जाणीवच ट्रेडर्स ठेवत नाहीत. मला ज्या हजारो ईमेल्स येतात त्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे आमचा अमुक ट्रेड चुकला, मला आत्ता इतका लॉस होत आहे, हा लॉस मला सहन होत नाही. या ट्रेडमधून बाहेर कसे पडायचे ते सांगा अश्या स्वरुपाच्या असतात. या सर्व ट्रेडर्ससाठी "बैल गेला अन्‌ झोपा केला" ही म्हण तंतोतंत लागू पडते. असे म्हणतात की युद्ध हे प्रत्यक्ष सुरु होण्याअगोदरच जिंकले जाते. जी व्यक्ती युद्धामध्ये काय काय

घडू शकेल याचे सर्व आडाखे मनामध्ये मांडून मग युद्धामध्ये उतरते ती व्यक्ती युद्धामध्ये यशस्वी होते. शेअर ट्रेडिंग हे एक युद्धच आहे. या युद्धामध्ये उतरण्याअगोदरच आपल्याला हे जाणून घेतले पाहिजे, की या युद्धामध्ये आपली मॅक्सिमम रिस्क काय आहे.


समजा तुम्हाला एखादा शेअर वर जाईल असे वाटले. या शेअरची सध्याची किंमत समजा शंभर रुपये असेल, तर तुम्ही ट्रेड घेण्याआधी हा विचार केला पाहिजे, की समजा हा शेअर वर न जाता खाली पडू लागला तर आपण काय करणार? किती काळ या शेअरमधील आपली पोझिशन धरुन ठेवणार. हा सर्व अभ्यास करुन जर तुम्ही तो ट्रेड घेतलात तर नंतर तुम्हाला त्रास होऊच शकत नाही. तुमची समजा अशी अपेक्षा असेल, की शेअरची किंमत एकशे पन्नास रुपये होईल आणि खरोखर ती एकशे पन्नास झाली तर तुम्ही नफ्यामध्ये बाहेर पडाल. समजा अंदाज चुकला आणि शेअर खाली जाऊ लागला. अश्या वेळेस तुम्ही एक अशी किंमत मनामध्ये ठरवली पाहिजे की ज्या किमतीला तुम्ही लॉस सहन करुन बाहेर पडाल. यालाच स्टॉप लॉस असे म्हणतात. समजा वरील उदाहरणामध्ये तुम्ही नव्वद रुपये हा स्टॉप लॉस ठेवलात तर नव्वद रुपयांचा भाव दिसताच तुम्ही यामध्ये लॉस घेऊन बाहेर पडाल. असे काम करायची सवय तुम्हाला लागली की हळूहळू तुमचे काम यांत्रिक पद्धतीने होऊ लागते आणि मगच शेअर मार्केटमध्ये यश मिळू लागते. असे समजा दहा वेगवेगळे ट्रेड्स तुम्ही घेतलेत ज्यामधील पाच ट्रेड यशस्वी झाले आणि पाच ट्रेड्समध्ये नुकसान झाले तरी गोळाबेरीज तुम्हाला दोनशे रुपयांचा नफा होईल. गणित करुन बघा! सर्वसामान्य ट्रेडर्स नेमके याच्या उलट करतात. प्रॉफिट होत असेल तेव्हा लवकरात लवकर बाहेर पडतात आणि लॉसवाले ट्रेड्स धरुन बसतात. ही सर्वसामान्य चूक जरी आपण टाळू शकलो तरी "बैल गेला अन्‌ झोपा केला" असे म्हणायची वेळ आपल्यावर येणार नाही. "बैल" अर्थात "बुल" हे शेअर मार्केटमधील तेजीचे प्रतिक आहे. त्यामुळे जोवर तेजी आहे तोवरच आपण सर्व व्यवस्था करुन ठेवणे आवश्यक आहे. शेअर मार्केटमध्ये यशस्वी काम करणे हे एक सोपे शास्त्र आहे. हे शास्त्र जर तुम्हाला व्यवस्थित शिकायचे असेल तर गुंतवणूक कट्ट्याद्वारे येत्या रविवारी एका विनामूल्य वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार नक्की अटेंड करा.


वेबिनार विनामूल्य आहे परंतु रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण होताच वेबिनारची लिंक तुम्हाला पाठवली जाईल


रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar


इतर कोणत्याही शंकेकरिता connect@guntavnook.com येथे ईमेल करावी.


धन्यवाद!


नीरज बोरगांवकर



1,276 views1 comment

1 Comment


chougulen995
May 11, 2022

Correct ....आजचे काम आजच केले पाहिजे आणि ही म्हण आपल्या आयुष्यात सर्वच ठिकाणी लागू

Like
bottom of page