शेअर मार्केटमध्ये काम करणे हे एका युद्धाप्रमाणे आहे. या शेअर बाजारामध्ये दररोज "बुल्स" आणि "बेअर्स" या प्रवृत्तींमध्ये एक जोरदार युद्ध सुरु असते. बुल्स मंडळी ही कायम शेअर बाजार वर नेण्याचा प्रयत्न करीत असतात तर बेअर्स हे शेअर बाजार खाली पडावा म्हणून प्रयत्नशील असतात. बुल्स आणि बेअर्स ही खरेतर अतिशय सोपी संकल्पना आहे. शेअर बाजार हा मागणी व पुरवठा याचा खेळ आहे. एखाद्या कंपनीच्या शेअर्सची बाजारामधील मागणी जेव्हा वाढते, तेव्हा त्या शेअरची किंमत वर वर जाऊ लागते. म्हणजेच त्या शेअरमध्ये बुल्स कार्यरत होतात. एखाद्या कंपनीबद्दल काही चांगली बातमी येते, किंवा त्या कंपनीच्या बाबतीमध्ये एखादी सकारात्मक घटना घडते तेव्हा बाजारामधील "बुल्स" उसळी घेतात आणि या शेअरमध्ये मागणी निर्माण करुन शेअरचा भाव वर वर नेण्याचा प्रयत्न करु लागतात. याच वेळी "बेअर्स" हे या वाढलेल्या मागणीपेक्षा जास्त पुरवठा करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. यामुळेच आपल्याला सर्व शेअर्सच्या किमतींमध्ये सतत वर खाली वर खाली असे चढ-उतार बघायला मिळत असतात.
वर सांगितल्याप्रमाणे "बुल्स" आणि "बेअर्स" या कोणी व्यक्ती नसून प्रवृत्ती आहेत आणि बाजारामधील परिस्थितीनुसार या प्रवृत्तींमध्ये सतत हारजीत सुरु असते. शेअरची किंमत वर जात असते तेव्हा "बुल्स" चा विजय होत असतो आणि शेअरची किंमत जेव्हा खाली जात असते तेव्हा "बेअर्स"चा विजय होत असतो. या प्रवृत्तींना बुल्स आणि बेअर्स अशी नावे पडण्यामागील कारण आपण मागील एका लेखामध्ये बघितले आहेच. बैल मारामारी करताना समोरच्याला शिंगाने वर उडवतो, तर अस्वल मारामारी करताना समोरच्याला पंज्याने खाली दाबत असते. म्हणून ही नावे पडलेली आहेत. सर्वसामान्य ट्रेडर जेव्हा बाजारामध्ये ट्रेडिंग करण्याकरिता येतो तेव्हा त्याला या युद्धामध्ये सहभागी व्हावेच लागते. ट्रेडिंग करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला बाजाराविषयी एक दृष्टीकोन तयार करणे. जेव्हा आपण ट्रेड करण्यासाठी मैदानामध्ये उतरतो तेव्हा आपण सर्वप्रथम बाजार वर जाईल की खाली पडेल हे ठरवतो आणि त्यानुसार ट्रेड घेतो. आपल्याला जर असे वाटत असेल की बाजार आता इथून पुढे वर जाऊ शकतो, तर आपण "लॉंग पोझिशन" घेतो. म्हणजेच आपल्याला हवे असलेले शेअर्स खरेदी करतो. आणि या शेअरचा भाव वर जाण्याची वाट बघतो. आपल्याला जर असे वाटले की बाजार इथून खाली पडेल, तर आपण "शॉर्ट पोझिशन" घेतो. म्हणजेच एक विक्रीची पोझिशन तयार करतो जेणेकरुन भाव खाली आला की आपले विकलेले शेअर्स कमी भावामध्ये पुन्हा खरेदी करता येतील आणि फायदा मिळवता येईल!
या ट्रेडिंगमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल आणि सातत्यपूर्वक यामधून नफा मिळवायचा असेल तर आपल्याला काही कळीचे मुद्दे समजून घ्यावे लागतील. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बाजारामधील भाव हा कायम मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरणार आहे. आपण शेअर घेतले म्हणून भाव वाढायलाच पाहिजे असे कोणतेही बंधन नाही. थोडक्यात आपला अंदाज चुकू शकतो याची खूणगाठ आपल्याला मनाशी बांधली पाहिजे. शेकडा नव्वद टक्क्यांहून जास्त रिटेल ट्रेडर्सना कधी कधी एका धर्मसंकटाला तोंड द्यावे लागतेच लागते. आजवर मी हजारो ट्रेडर्सना या धर्मसंकटामध्ये सापडलेले बघितले आहे. तुम्हालादेखील आता समजेल, की मी कोणत्या धर्मसंकटाबद्दल बोलत आहे.
काय आहे बरे हे धर्मसंकट?
एक ट्रेडर असतो. मार्केटमध्ये जबरदस्त तेजी येणार.. असे त्याला कोणीतरी सांगते.. हा ट्रेडर धीर करुन एक लाख रुपयांचे क्ष कंपनीचे शेअर्स शंभर रुपयांना विकत घेतो. त्या दिवशी शेअरच्या भावामध्ये कोणतीही हालचाल होत नाही. भाव आहे तिथेच बंद होतो. हा ट्रेडर घरी जाऊन शांतपणे झोपतो. मध्यरात्री काय होते देवाला ठाऊक, आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये काहीतरी गडबड होते आणि दुसर्या दिवशी आपला बाजार गॅप डाऊन! याने घेतलेल्या शेअरची किंमत नव्वद रुपयांवर येते. आपला ट्रेडर हा पॉझिटिव्ह थिंकर असतो. त्यामुळे तो त्याचे शेअर्स होल्ड करतो परंतु भाव काही केल्या वर जात नाही. एक आठवडा, दोन आठवडे, महिना, सहा महिने उलटतात. याच्या शेअरचा भाव ऐंशी रुपयांच्या वर जायला मागतच नाही. आता ट्रेडर बर्यापैकी कंटाळलेला असतो. आणि मग तो दिवस उजाडतो. जगभरातील सर्व बाजारांमध्ये जोरदार हिरवळ दिसू लागते. सर्व बाजार जबरदस्त तेजी दाखवतात. आणि आपल्या ट्रेडरचा शेअर वीस टक्के वर जातो आणि पुन्हा शंभर रुपयांचा भाव दाखवू लागतो. आपला कंटाळलेला ट्रेडर झटपट अकाऊंटमध्ये लॉगिन करतो आणि सर्व शेअर्स शंभर रुपयांना विकून टाकतो आणि सुटकेचा नि:श्वास सोडतो. आता याचे अडकलेले पैसे मोकळे झालेले आहेत. त्यामुळे ट्रेडर खूष आहे. पण हे राम! इथून पुढील तीन महिन्यांमध्ये शेअरचा भाव शंभर, एकशे दहा, एकशे वीस, एकशे पन्नास आणि पार दोनशे रुपयांपर्यंत पोहोचतो. आपल्या ट्रेडरने कपाळाला हात लावुनच ठेवलेला असतो, कारण आता काय पुढे करावे हे धर्मसंकट आ वासून त्याच्यापुढे उभे असते!
ही परिस्थिती तुमच्या बाबत कधी घडली आहे काय? नक्कीच कधी ना कधीतरी घडलेली असणार. कारण शेअर बाजाराचे दुसरे नाव म्हणजे "रिग्रेट मशीन" अर्थात "पश्चात्तापाचे यंत्र" असे आहे! शेअर घ्यावा तरी पंचाईत, न घ्यावा तरी पंचाईत. घेऊन विकावा तरी पंचाईत, न विकावा तरी पंचाईत! आखिर करे तो क्या करे? अशी हालत शेकडा नव्वद टक्के ट्रेडर्सची होत असते. परंतु या परिस्थितीमधून वाचायचे असेल आणि सातत्यपूर्वक यामध्ये नफ्यामध्ये रहायचे असेल तर ट्रेडरला काही पथ्ये पाळण्याची आवश्यकता आहे. सर्वात पहिल्यांदा शेअरचे भाव कसे हालतात हे व्यवस्थित शिकून घ्यावे लागेल. आणि या भावांचा अभ्यास केला पाहिजे. दुसरे पथ्य म्हणजे शेअर घेताना "पोझिशन साईझिंग" आणि "स्टॉप लॉस"च्या नियमांचे पालन केले पाहिजे. रिटेल ट्रेडर अक्षरश: अंदाधुंद पद्धतीने पोझिशन्स घेत असतात आणि कुठलाही स्टॉप लॉस वगैरे न लावता बिनधास्त खेळत असतात. यामुळेच नंतर त्यांच्यावर रडण्याची पाळी येते. तिसरे पथ्य म्हणजे "शिस्त"! शाळेमध्ये आपल्याला शिस्त पालन शिकवले. कॉलेजात आल्यावर आपण ही शिस्त बासनात गुंडाळून ठेवली. सर्वांबाबत नाही म्हणत, परंतु आज बहुतांश लोक शिस्त पाळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मुळात रिटेल ट्रेडरची मानसिकता फक्त "माल लाओ" या प्रकारची असते. "माल" मिळण्यासाठी कष्ट करावे लागतात, घाम गाळावा लागतो, याचा कुठेतरी बहुतांश लोकांना विसर पडलेला दिसतो. आता शेअर बाजारामध्ये प्रत्यक्ष अंगमेहनत करुन घाम जरी गाळावा लागत नसला, तरी आपल्या मेंदुला कष्ट हे करावेच लागतात. वेगवेगळ्या शेअर्सचा अभ्यास करावा लागतो. डोके शांत ठेवून योग्य निर्णय घ्यावे लागतात. भले ते निर्णय कठोर वाटले तरीदेखील ते घ्यावेच लागतात, कारण शेवटी हे एक युद्ध आहे. शेअर मार्केटच्या या रणांगणावर जर तुम्हाला एक यशस्वी योद्धा बनायचे असेल तर तुमच्यासाठी येत्या रविवारी एका वेबिनारचे आयोजन केले आहे. शिकायची तयारी असेल तरच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करा.
(वेबिनार मोफत आहे, परंतु रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.)
हॅलो सर,
आत्ताची मार्केटची परिस्थिती पहाता, FII ची सतत विक्री चालू आहे, रशिया - युक्रेन युद्धाची परिस्थिती चिंताजनक आहे, महागाई वाढ चालूच आहे चीनमध्ये कोरोनाची संख्या वाढत आहे
Feb 2020 मध्ये कोरोनाच्या संकटामुळे मार्केटमध्ये खूप पडझड झाली. त्यानंतर V shape मध्ये मार्केट वर आले तेही प्रचंड उसळी घेत, आत्ताचा ट्रेण्ड पहाता मार्केट करेक्ट होत आहे की काही अभ्यासकांच्या म्हणण्या प्रमाणे मार्केट परत 20000 - 25000 कडे झेपावेल.
याविषयी आपले मत काय आहे?
साध्या सोप्या भाषेत येथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
Very nice explanation 💫