आज आपण ऑप्शन ट्रेडिंग या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. तुमच्यापैकी बर्याच लोकांना ठाऊक नसेल, परंतु 2020-2021 या आर्थिक वर्षामध्ये आपल्या देशामध्ये सुमारे बत्तीस लाख कोटी रुपयांचे ऑप्शन्सचे व्यवहार झाले. आणि हाच आकडा 2021-2022 या आर्थिक वर्षामध्ये सत्तर लाख कोटी रुपयांवर पोहोचला. म्हणजेच ऑप्शन्सचा व्यापार डबल झाला. इतकेच नाही तर आज 28 एप्रिल रोजी आपण हे बोलत आहोत. म्हणजेच नविन आर्थिक वर्षाच्या पहिल्या 17 ट्रेडिंग सेशन्समध्ये या ऑप्शन्समध्ये सात लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवहार ऑलरेडी झालेले दिसत आहे (या माहितीचा स्त्रोत - नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची अधिकृत वेबसाईट). या माहितीवरुन आपल्याला असे लक्षात येते की आपल्या देशामध्ये ऑप्शन ट्रेडर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. फ्युचर्स आणि ऑप्शन्स या सेगमेंटमधल्या एकूण वाढीचा विचार केला तर गेल्या पाच वर्षांमध्ये या क्षेत्रामध्ये सरासरी वार्षिक 80% टक्क्यांहून अधिक वाढ होत आहे. याचाच अर्थ फ्युचर्स आणि ऑप्शन्स ही आपल्या देशामधली एक बूमिंग इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये येत्या काळामध्ये प्रचंड मोठ्या संधी आहेत आणि या संधी मिळवण्यासाठी आपल्याला हा धंदा नीट समजून घेतला पाहिजे.
ऑप्शन्स ट्रेडिंग हा धंदा काय आहे?
मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. ऑप्शन्समध्ये दोन प्रकार असतात - "कॉल ऑप्शन" आणि "पुट ऑप्शन". जास्त विचार करु नका. कॉल ऑप्शन म्हणजे मायबोलीमध्ये "खरेदी करण्याचा हक्क" आणि पुट ऑप्शन म्हणजे "विक्री करण्याचा हक्क" बास! इतकेच आहे. समजा अबक या कंपनीचा शेअर आत्ता शंभर रुपयांवर ट्रेड होत आहे, तुम्हाला असे वाटले, की हा शेअर या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत दीडशे रुपयांवर जाईल तर तुम्ही शंभर रुपयांचा "कॉल ऑप्शन" तुमच्या कडे विकत घेता. तुमचा अंदाज जर खरा ठरला आणि शेअरचा भाव खरोखर दीडशे रुपयांवर गेला तरी तुमच्याकडे तोच शेअर शंभर रुपयांना खरेदी करण्याचा हक्क असेल आणि तुम्ही तो बजावून फायदा देखील मिळवू शकाल! याच्या बरोब्बर उलट म्हणजे समजा तुमचा असा अंदाज आहे, की अबक चा शेअर या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत खाली पडेल आणि पन्नास रुपयांवर येईल तर तुम्ही त्या शेअरचा शंभर रुपयांचा पुट ऑप्शन तुमच्याकडे विकत घेता. तुमचा अंदाज खरा ठरला आणि शेअरचा भाव खरोखर पन्नास रुपयांवर आला तरी तुमच्याकडे तोच शेअर शंभर रुपयांना विक्री करण्याचा हक्क असेल आणि पुन्हा तुम्ही तो बजावून फायदा मिळवू शकाल! आता कॉल आणि पुट हे हक्क फुकटात मिळतात का हो? तर नाही, हे हक्क तुम्हाला "प्रिमियम" भरुन विकत घ्यावे लागतात. हा जो प्रिमियम असतो तो वेळेनुसार कमी कमी होत जातो. दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी डेरिव्हेटिव्ह कॉंट्रॅक्ट्सची एक्स्पायरी म्हणजेच शेवटचा दिवस असतो. या दिवशी सर्व डेरिव्हेटिव्ह कॉंट्रॅक्ट्स "एक्स्पायर होतात". महिन्याच्या एक तारखेला जर ऑप्शन प्रिमियमचा दर दहा रुपये असेल तर दर दिवशी हा प्रिमियम कमी कमी होत एक्स्पायरीच्या दिवशी शून्य होतो. (भाव आहे तिथे राहिला तर!)
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्ही "ऑप्शन बायर" म्हणूनदेखील काम करु शकता तसेच "ऑप्शन सेलर" म्हणूनदेखील काम करु शकता. होय, सर्वसामान्य कोणीही व्यक्ती ऑप्शन्स सेलर म्हणून बाजारामध्ये काम करु शकते. बहुतांश लोकांना ऑप्शन सेलिंगबद्दल माहिती नसते आणि ऑप्शन सेलिंग करण्यामध्ये इंटरेस्टदेखील नसतो. कारण सोपे आहे - ऑप्शन खरेदी करण्यासाठी अतिशय कमी भांडवल लागते. परंतु ऑप्शन सेलर होण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. यामुळे बहुतांश रिटेल ट्रेडर्स ऑप्शन खरेदीचा मार्ग स्वीकारतात आणि इथेच या सर्वांची चूक होते. लेखाचे शीर्षक नीट वाचा - "ऑप्शन खरेदी करणे म्हणजे जवळ फ्रीज नसताना बर्फाचे गोळे विकण्याचा धंदा करण्यासारखे आहे!" आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. समजा तुम्ही असे ठरवले, की माझ्याकडे एक पाच हजार रुपये आहेत, या पाच हजार रुपयांमध्ये मी बर्फाचे गोळे विकण्याची गाडी लावतो आणि व्यवसाय सुरु करतो. परंतु तुमच्याकडे फ्रीज नाही. काय होईल अश्या परिस्थितीमध्ये? सकाळी तुम्ही बर्फाची लादी विकत घ्याल, गाडीवर टाकाल आणि स्टॉल लावून गोळे विकायची सुरुवात कराल. दुपार जसजशी होत जाईल तसतसा तुमच्याजवळील बर्फ वितळू लागेल आणि दिवस संपताना तुमच्या बॉक्समध्ये फक्त पाणी उरलेले असेल. दिवसभरात गिर्हाईक आले तर ठीक नाहीतर सगळे भांडवल पाण्यात! ऑप्शन खरेदी करणार्यांचे देखील बहुतेक वेळेला असेच होते. कारण शंभर रुपयांची वस्तु शंभर रुपयांना खरेदी किंवा विक्री करण्याचा हक्क विकत घेण्यासाठी तुम्ही "प्रिमियम" देत आहात. हा प्रिमियम तुम्ही फक्त आणि फक्त "वेळे"साठी देत आहात. नियोजित वेळेमध्ये जर तुम्हाला अपेक्षित अशी प्राईज मूव्हमेंट झाली नाही तर तुम्ही भरलेला प्रिमियम हा शून्य होणार आहे. ऑप्शन ट्रेडिंग करताना "नेकेड पोझिशन्स" कधीच घ्यायच्या नसतात. ऑप्शन ट्रेडिंग करताना काही कॉम्बिनेशन स्ट्रॅटेजीज् वापरुन काम करायचे असते. हे जिला योग्य वेळी समजते ती व्यक्ती ऑप्शन ट्रेडिंगमध्ये यशस्वी होऊ शकते.
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये स्ट्रॅटेजी कश्या वापरल्या जातात हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आपल्या Neeraj Borgaonkar या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. वेळ मिळेल तेव्हा हा व्हिडिओ नक्की बघा.
गुंतवणूक कट्ट्याद्वारे शेअर मार्केट व गुंतवणूक या विषयाबद्दल प्रशिक्षण देण्याकरिता अनेक उपक्रम राबवले जातात. येत्या रविवारी दुपारी बारा वाजता "पोझिशनल ट्रेडिंग" या विषयावर एका विनामूल्य वेबिनारचे आयोजन केले आहे. या वेबिनारला उपस्थित राहण्याकरिता (विनामूल्य) रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. पुढील लिंकवरुन या वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन करता येईल - https://www.guntavnook.com/webinar
रजिस्ट्रेशन पूर्ण होताच वेबिनारची लिंक व्हॉट्सअॅप व ईमेलवर पाठवण्यात येईल.
सर, बर्फाचे गोळे पाहून तोंडाला पाणी सुटले.